Skip to main content

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप्याला मान. कारण आमचा बोलण्यात कुणीच हात धरू शकत नाही आणि वरून आडनाव पवार तेपण सहयोग सोसायटी बारामतीतले. अजून एक अवलिया पुरुष म्हणजे 'चिक्या'-आमचा बेवडा. हा दारू कधीच प्यायला नाही पण नेहमी बोलताना उच्चार एवढे उच्च कि ९०च्या दोनतरी लावून आल्यासारखं वाटणार. असं करत करत ८पर्यंत सुरु केलेला खेळ २तासात २सामने संपवून सगळे आपापल्या घरी रवाना. अंघोळ,नाश्ता करून पुन्हा १तासात निम्मेअर्धे आय.झोन. सायबर कॅफेत जमणार. २तास कॉउंटर स्ट्राईक गेममध्ये तुफान गोळीबार करून थकल्याभागल्या अवस्थेत सगळे घरी जाऊन जेवण करून झोपणार. तसे सगळी काम आवरून रात्री ८ला जीन ग्राऊंडवर गाड्या घेऊन जमणार. इमरानदादा हाश्मी यांच्या गाण्यांचा (ऑडिओ) आस्वाद घेत तिथं २-२.५तास गप्पा झोडून सगळे आपल्या आपल्या घरी निघणार.
        असा दिनक्रम  २आठवडे अगदी निवांत चालू होता. एके दिवशी अचानक कुणाला हुकी आली काय माहित , १२.३०ला गेम खेळून घरी निघणार तेवढ्यात कोणतरी म्हणलं 'चला धुमाळवाडीला जाऊ. धबधबे असतात तिकडं. लय भारी आहे स्पॉट. '-बारामतीपासून फलटण मार्गे साधारणतः ८० किमी असलेल्या धुमाळवाडीला २जण आधी जाऊन आले होते.
    लहानपणापासून सगळे म.ए.सो.चे विद्यार्थी, मुलांची-मुलींची शाळा वेगळी. परिणामी मुलांच्यात भयंकर एकता ज्याला आजकाल बॉण्डिंग म्हणतो. एखाद्याने काय करायचं म्हणलं की काहीही असो हो नाही म्हणत सगळे सहभागी होणार. तसं आज धुमाळवाडीला सगळे निघाले. रस्ता माहित होता त्यांना पुढं करून प्रवास सुरु झाला. पल्ल्याकडं सिबीझेड, साकेत दादांची स्प्लेंडर आणि आमची स्कुटी घेऊन ६जणांचा ताफा धुमाळवाडीला रवाना झाला.
             माझ्या गाडीवर बेवडा होता. तो आधी जाऊन आल्यामुळं मी जाताना त्याला उत्सुकतेनं विचारत होतो 'चिक्या आयला आपण चाललोय पण भूक लागलीय राव. खायला काय असतंय का तिकडं?' तोपण तिकडं रोजचं येणंजाणं असल्याच्या स्वरात बोलला 'चल रे तू. भजी-वडापाव सगळं असतंय.' त्या काळात बाहेर वडापाव खाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. त्यात घरून परवानगी नसताना चोरून खाण्यातली मजा औरच. अन आम्ही तर धबधबा पाहायला चाललो होतो. मग काय नुसती स्वप्न रंगवत त्या रखरखत्या उन्हात गाड्या दामटत आम्ही २-२.३०तासांच्या प्रवासानंतर धुमाळवाडीला पोचलो.

पण तिथलं दृश्य पाहून सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं....

     समोर निर्मनुष्य टेकड्या, झाडांना पानांचा तपास नाही, दुष्काळामुळं कुठं पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता आणि आम्ही मात्र धबधबे पाहायला आलो होतो. आता मात्र पंचाईत झाली होती धबधबा सोडा पाण्याचा एक साधा झरापण नाही, एक तर आधीच भूक लागली होती त्यात चिक्यानं सांगितलेल्या भजी वडापावचापण काहीच पत्ता नव्हता. गाडीवरून उतरून सगळे एकमेकांवर आरोप करू लागले 'ह्याची आयडिया होती.' आयडियावाला म्हणला 'मला काय बारामतीतून पाणी दिसणार आहे का इकडचं.' मीपण चिक्याला २ टपल्या मारून विचारु लागलो 'कुठंय वडापाव भजी.'
         असं १५-२०मिनिटं चालल्यानंतर शेवटी एकमेकांवर हसून त्याचा शेवट झाला. आता आलोय तर तसंच कसं परत जाणार म्हणून भराभर सगळे त्या टेकड्यांवर चढले. चढताना वेड्यावाकड्या पोझ देत फोटोशूट चालू होता. कुठंतरी दोघाचौघांना एखादं पाण्याचं डबकं दिसायचं आणि धबधबा, धबधबा म्हणून आरडाओरडा व्हायचा. अन सगळे तिथं जमायचे. १-२ तास असेच गेले.ह्या गमतीजमती चालू असताना कुणालाही लागलेल्या भुकेचं भान नव्हतं अन वर कुणाचं तरी लक्ष गेल तर सूर्य मावळायला लागला होता. ते पाहून घरापासून ८०किमी लांब असल्याची जाणीव झाली अन जसे चढले तसे भराभर सगळे खाली उतरले. अन गाड्यांवर बसून पुन्हा बारामतीच्या दिशेने सुसाट निघाले. एव्हाना सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते पण फलटणपर्यंत खायला काहीच मिळालं नाही. शेवटी फलटणमध्ये पोचल्याबरोबर सगळ्या गाड्या राजस्थानी स्वीटहोमसमोर थांबल्या. सूर्य मावळत चाललाय हे दिसत होतं, त्यामुळं सर्वांनी सामोसे आणि जिलेब्यांच पार्सलच घेतलं, एकाने गाडी चालवायची आणि दुसऱ्याने मागं बसून खायचं असं ठरवून तिथून ताबडतोब पळ काढला.
            तसा फलटण बारामती रस्ता तसा ठिकठाकच. त्यामुळं रमतगमत सामोसे आणि जिलेब्या खात आमचा परतीचा प्रवास चालु झाला होता. तेवढ्यात चिक्याला सुलतानचा फोन आला. सुलतान म्हणजे चिक्याचे तीर्थरूप. एकदम पांढराफेक पुढारी पोशाख. डोळ्यावर काळा चष्मा, पंढरेच बूट. थोडक्यात त्यावेळी आलेल्या 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई'मधल्या 'सुलतान मिर्झा'सारखा लुक होता त्यामुळं शाळेतल्या पोरांनी सुलतान नावाने नामकरण केलं होतं. चिक्या दिसतो तेवढा गरीब नसला तरी सुलतान अतिशय कडक अशी त्यांची ओळख. कुठंय विचारल्यावर चिक्यानं  'एम.आय.डी.सी.मध्ये माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे परत निघालोच आहे' असं सांगून मोकळा झाला. अन मागच्याच आठवड्यात माझा वाढदिवस झाला होता. पण सुलतानच्या ते लक्षात आलं नाही त्यामुळं बरं झालं. एम.आय.डी.सी. ते बारामती अंतर फार तर १०मिनिटांचे, न इकडं आम्हाला पोहोचायला पाऊण तास तरी लागणार होता. त्यामुळं खाणं भरभर आवरून आम्ही गाडीचा वेग वाढवला. पोहोचेपर्यंत अजून एकदा सुलतानचा फोन झाला, ५ मिनीटांच आश्वासन देऊन पुन्हा ठेवून भरधाव वेगात पुढच्या २०मिनिटात बारामतीला पोचलो होतो.

           आज नेहमीच्या मस्त दिनक्रमात १२.३०ला कुणीतरी आज ठिणगी टाकली होती. त्या ठिणगीने पेट घेऊन ६ जणांना उपाशीपोटी धुमाळवाडीला पोहोचवलं होतं. दुष्काळाने त्या पेटलेल्या ६ जणांना धबधब्यांऐवजी २डबकी दाखवून विझवलं होतं,भुकेची तमा न बाळगता,एकमेकांवर आरोप करत पुन्हा सगळ्यांनी  मज्जा केली होती, खात खात रमतगमत येत असताना, सुलतानने आमची गोची केली होती. असं करत करत ७-७.३०च्या दरम्यान आम्ही मजल दरमजल बारामतीला पोचलो होतो, अन घरी जाऊन सगळे थोडंस खाऊन डायरेक्ट झोपी गेलो होतो. लागलेल्या झोपेबरोबर एका अविस्मरणिय दिवसाचा शेवट झाला होता.....

--- वृषाल भोसले
+91 7798809900

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित