Skip to main content

गण्याची गेट

इंजिनीरिंगचा शेवटच्या दिवसांची मजाच काही वेगळी होती.. प्रत्येक पाखराला त्या घरट्यातून उडण्याची आस होती, अन सोबत्यांचा लळाही लागून गेला होता. (पुढे जाऊन काहींची लग्नही जुळली)

अशाच वातावरणात शेवटचं सत्र सुरू होतं. पाहता पाहता जानेवारीचा मध्य ओलांडला होता. अचानक एक दिवस आमच्या विभाग प्रमुख वर्गात आल्या आणि म्हणाल्या की आपल्याला एक कॉन्फरन्स भरवायची आहे. स्वयंसेवक म्हणून तुमची काम करायची तयारी आहे का? सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. पण माझ्या मनात अचानक काय आलं काय माहीत शेजारी वर्गप्रमुख बसल्या होत्या. त्यांना हळूच म्हणलं आपल्याला गेट परीक्षेच्या अभ्यासाला सुट्टी मागा. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये गेट म्हणजे खूपच प्रतिष्ठेची परीक्षा होती. विभागप्रमुख जशा हो म्हणल्या तसा मी एक अर्ज लिहिला वर्गाच्या वतीने आणि तो तास संपल्याबरोबर मॅडमच्या टेबलवर सर्वांच्या सह्यांसाहित हजर केला. घाईगडबडीत मॅडमने त्याला मान्यताही देऊन टाकली.
जशी सुट्टी मान्य झाली तशी दुसऱ्या दिवशी सगळी पब्लिक गायब. मॅडमला काही समजेना कुठं गेली सगळी अचानक. स्थानिक विद्यार्थी म्हणून आम्हा २-४जणांना फोन करून बोलावण्यात आलं. तर तिथं समजलं की मॅडमने ७दिवसांची सुट्टी मंजूर केली होती आणि आम्ही त्या अर्जावर १५दिवस लिहिलं होतं. आता मात्र मोठी पंचाईत झाली होती. मॅडमचं म्हणणं होतं की लोकांना वर्गात बोलवा पुन्हा ८दिवस, काही मंडळी घरच्या दिशेने रवाना झाली होती तर राहिलेल्याना आम्ही येतानाच सर्वाना सांगून आलो होतो की कुणीही फोन उचलायचे नाहीत उचलले तरी घरी आहे सांगायचं, अन्यथा आपली सुट्टी रद्द होईल.
अशा परिस्थितीत आम्ही तिथं काहीतरी जुळवाजुळव करून ती सुट्टी १५दिवसाची फायनल करून टाकली.
मग काय पूर्ण वर्गात आनंदाचं वातावरण, अभ्यासाच्या सुटीच्या नावाखाली कुणी रोज खेळायला ग्राउंडवर, कुणी आवडत्या इंग्रजी सिरीज पाहत बसलंय, कुणी सक्तीचा आराम करतंय, वर्गातल्या एक मुलींच्या ग्रुपने तर जोरदार उपक्रम राबवला. प्रत्येकीच्या घरी २-२दिवस राहायचं ठरवून १५दिवसाची ट्रिपच करून टाकली. त्यातून काही २-४उरले होते त्यांनी अभ्यासाला जोरदार सुरुवात केली. हा हा म्हणता गेट.चा दिवस उजाडला. सर्वांनी गेट परीक्षा दिली.
त्यानंतर ती कॉन्फरेन्सही उत्साहात पार पडली. शेवटी गेटच्या निकालाची रात्र उजाडली. अशा परीक्षांचे निकाल हे रात्रीच लागायचे. जसा निकाल लागला तसा प्रत्येक विभागात एकच हाहाकार उडाला. तुमचे किती लोक क्यलिफाय झाले, आमचे किती. क्वालिफाय झालेल्यांच अभिनंदन होत होतं.
दुर्दैवाने आमच्या वर्गातील २-४ लोक खूप कमी अंतराने क्वालिफाय व्हायचे राहून गेले. पण चर्चा झाली पाहिजे म्हणून आमच्या वर्गाच्या व्हाट्सअप्प ग्रुप वर आम्ही वर्गातील सर्वात अभ्यासू मुलगा गण्याचं नाव पुढे करून तो क्वालिफाय झालाय असं उगाच जाहीर करून त्याला शुभेच्छा दिल्या आणि सर्वजण झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी त्या सुट्टीत फिरायचा उपक्रम घेतलेल्या मुलींच्या घोळक्याने सकाळी सकाळी विभागप्रमुख मॅडमला जाऊन गण्या क्वालिफाय झाल्याचं सांगून टाकलं. जस ते ऐकलं तशा मॅडम आमचं प्रॅक्टिकल सुरू होत तिथं घाईगडबडीत पोचल्या आणि येऊन गणेश उभा रहा म्हणलं. अत्यंत आशेच्या नजरेनं विचारलं ' गेट क्वालिफाय झालास तू?'
गण्याला २मिनिटे काही समजलंच नाही पुन्हा विचारल्यावर दबक्या आवाजात नाही म्हणून सांगितलं तसा मॅडमचा हिरमोड झाला आणि त्या तणतणत निघून गेल्या.
नंतर गण्याला आम्ही एव्हडा का घाबरला विचारलं असता तो म्हणाला की 'अरे. घाबरणार नाहीतर काय.. मी गेट परीक्षाच दिली नव्हती.. मी राज्यसेवेचा अभ्यास करतोय..' आणि वर्गात एकच हशा पिकला होता..!!!

 - वृषाल शब्दातला
+91 7798809900

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या", "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!! त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय.. 'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!! बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!! आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी...

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप...

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित...