Skip to main content

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो,

शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात,
डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात.

इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!"
सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो.

आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात.
४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..!

रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते.

जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित्रांबरोबर शेवटचे क्षण आनंदानं घालवू, ह्या विचारात गुर्फटलेला त्यांच्यातील तरुण एक गोंडस बाळ होऊन जातो. ज्या बाळाला हे सगळंच करायचं असतं पण वेळ अपुरा पडत असतो. कारण मनात चाललेल्या विचारांच्या कोलहलात पुन्हा ही लोकं भेटतील ह्याची शाश्वती कमी होत चाललेली असते.

अशा वेळी रोज कुणीतरी बिझनेस टाकू, आपण पुण्यात एकत्र राहू, कॉन्ट्री काढून चारचाकी घेऊ, एमपीएस्सी करू, दर आठवड्याला ट्रिप काढू, अशा गप्पांचा फड रंगवत १५-२० मिनिटात अवघ पुणे विकत घेत असतो.

अशा गदारोळात शेवटचा आठवडा उजाडतो.
इतर वेळी नेहमी परीक्षेच्या ताण घेऊन सैरभैर करणारी पाखरं अभ्यासापेक्षा हे ३-४वर्षांचं घर सुटणार ह्या विचाराने कोमेजून गेलेली असतात. इतर वेळी लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करणारा अभ्यासू मुलगा सर्वांना एकत्र घेऊन अभ्यास करत असतो, अन दिवसागणिक त्या अभ्यासाचं रूपांतर गप्पांच्या फडात होत गेलेलं असतं..

शेवटची परीक्षा संपल्यावर आपापल्या कुणी फटाके वाजवून आनंदी असल्याचं जगाला ओरडून सांगत असतो. पण मनात काहूर माजलेलं असतं ते शेवटच्या पाठवणीचं. एव्हाना वर्गातली ५०-६० लोक त्याचं कुटुंबातील सदस्य झालेले असतात, अन बॅच मधील इतर लोक पाहुणेमंडळी.

कुणाला आईवडील येऊन घेऊन जात असतात, कुणाला मित्रांचा गराडा सोडायला जात असतो, एखादा एकटाच कल्टी मारतो, तर एखादा कार्यकर्ता फक्त सगळ्यांना सोडायचा ड्युटीवर असतो.

पण निघताना प्रत्येक जणाच्या मनात दुःखाचा लाटांनी पूर आलेला असतो. तरी त्याने हसत आणि सगळ्यांना हसवत सगळ्यांचा निरोप घेत त्या पुराला बांधावरच अडवलेलं असतं. पण जसा परतीचा प्रवास सुरु होईल तसं डोळ्यापर्यंत आलेला अश्रूंचा बांध फुटलेला असतो. त्या अश्रूंच्या धारेपरलीकडं डोळ्यासमोर सगळ्यांना सोडून एक नवीन आयुष्य दरवाजा ठोठावत असतं जिथं त्याला त्याची लढाई फक्त एकट्याला लढायची असते..!!!

- वृषाल शब्दातला
+91 7798809900

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"येकदाच घुसणार, भगवाच दिसणार..!!" - सोशल मीडिया वॉरियर्स

आजकाल भडक ओळी लिहून DSLR मधून काढून एडिट केलेला फोटो टाकला की अवघ सोशल मीडिया त्यावर "एकदाच घुसणार, भगवाच दिसणार," "राडा करणारा पक्या", "आमचं काळीज", "दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस", अशा शब्दांनी तुटून पडतं..!! त्याच सोशल मीडियावर एक अशी जमात आहे जी त्यांना नावं ठेवायला सरसावलेली असतेय.. 'ते ना तसलंच हाय', 'नुसतं फोटो टाकत असतंय,' , 'नुसत्या पोस्ट टाकत असतंय'. बरं ते ह्याचे दररोज फोटो पाहतायत म्हणजे त्यांचाही वापर जवळपास तेवढाच..!! बरं टाकले त्याने फोटो, केल्या त्याने फालतू पोस्ट..!! त्याला बोलण्याअगोदर तुम्ही हे का झालं असेल त्याचा कधी सखोल विचार केला? तुमच्या काळात फोन नव्हते किंबहुना होते तरी न परवडणाऱ्या किमती. घेतला तरी एखाद्यकडच भारी फोन. त्याने घेतला तर तिच्याकडं नाही, तिच्या घरच्यांनी दिला तर त्याची ऐपत नाही..!! आजच्या किशोरवयीन पिढीला ह्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. ₹५००० मद्ये चांगल्या सोयींचा अँड्रॉइड फोन उपलब्ध होतो, जो तुम्हीच त्यांना वाढदिवसाला गिफ्ट देता. फेसबुक, इंस्टा, युट्युब ह्यासारख्या गोष्टी...

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप...