Skip to main content

राजा माणूस : सौरभ

           पाचवीला गेल्यावर घरच्यांनी शिक्षणासाठी खेड्यातून शहरात अर्थात बारामतीला जायचा निर्णय घेतला. माझा दाखला तालुक्यातील नामवंत शाळेत म्हणजेच म.ए.सो.विद्यालयात घालण्यात आला. शाळेत आल्यावर इथलं सगळं वातावरण अगदी नवीन होतं. सवय जिल्हा परिषद शाळेची- इथे अगदी एकच शिक्षक तेही दोन वर्गांना मिळून. त्यांना वाटेल तो विषय दिवसभर चालणार. इथं आल्यावर मोठी पंचाईत झाली होती. प्रत्येक विषयाला शिक्षक वेगळे, दर अर्ध्या तासाला मास्तर बदलणार, वेळापत्रक ठरलेलं, हुशारीप्रमाणे(गुणपत्रकावरच्या) तुकड्याही वेगळ्या. ह्या सगळ्या गोंधळात आम्हाला काही नवीन मित्र मिळाले. प्रगतीनगरचा पल्ल्या, कसब्यातला अक्षय, कॅनॉल रोडचे भोई बंधू, अशोकनगरमधील देशपांडेंचे गौरव आणि देवदत्त अन बाकीचे भरपूर जण. पण या सगळ्यात वेगळे होते ते आमचे चंगु मंगू अर्थात ओंकार आणि सौरभ पवार. मी पाहिलेलीआणि शाळेतली एकमेव जुळ्या भावांची जोडी.
       एक भाऊ आमच्या अ तुकडीत अन दुसरा ब तुकडीत. एकदम राम-लक्ष्मणाची जोडी. तब्येत दोघांचीही कायम कमीच, दिसायला दोघंही देखणे गडी. पण ना रामाला कधी सीता भेटली ना लक्ष्मणाने कधी शोधली. तसं बघायला गेलं तर दोघ फक्त नावाला जुळे हो. करामती सगळ्या वेगळ्याच. त्यातल्या त्यात सौरभ म्हणजे एकदम राजा माणूस, लहानपणापासून अगदी लाडात वाढलेला पण एकदम व्यावहारिक, रोखठोक आणि नशीबवानसुद्धा. जे काय असेल ते तोंडावर. म्हणजे ज्या काळात जाचकच्या कोणी नादी लागत नसायचं, तो आल्यावर पळायचे सगळे, त्या वेळी हा त्याला तू जयकांत शिक्रे सारखा दिसतो म्हणून मोकळा झालेला.
     नशीबवान लोक खूप पहिली पण भैय्याराव त्यातलं सगळ्यात अफलातून व्यक्तिमत्व. शाळेत दरवर्षी होणाऱ्या फनी गेम्समध्ये कधी एकही रुपया वाया न घालवता नफ्यात निघण्याचा विक्रम आजही भैय्यारावांच्याच नावावर आहे. भैय्यारावांच टायमिंग खूप जबरदस्त. टाकी कितीही तळाला असुद्या, आमच्या गाडीतलं पेट्रोल पंपाच्या शेजारीच जाऊन संपणार. त्याच रहस्य शोधण्यात नासाही साडेतीन वेळा अपयशी ठरली.
       इंग्रजीच्या भीतीमुळं शिक्षणाकडं कधी आमचा कल नव्हताच. पण तरीही भैय्या १२वीला सायन्स घेऊन अनपेक्षितरित्या पहिल्या दणक्यात पास झाले. पास झाल्यावर आनंद इतका कि तिकडं ७०-८०% टक्के पडलेली पोर ह्यात कमी त्यात कमी म्हणून तोंड पाडून बसलेली असताना आमच्या भैय्याइतका खुश प्राणी पूर्ण कॉलेजमध्ये नव्हता. त्यानंतर खूप इंजिनीरिंग पासून फार्मसीपर्यंत सगळी क्षेत्र त्यांनी चाखून पहिली पण कशातच मन लागलं नाही. आता एवढे सगळे उपद्व्याप म्हणल्यावर ह्यामागे कारण एखादी "उमललेली कळी" असणार अस फार लोकांच्या मनात येत असायच. पण भैय्यारावांच्या मनात वेगळीच गणित होती. त्यांना स्वतःचा व्यवसाय टाकून मोठा करायचा होता. स्वतःबरोबर अजून बाकी लोकांनाही रोजगार द्यायचं स्वप्न कायम उराशी बाळगून त्यावर रोज काही ना काही कल्पना ऐकायला भेटत असे. लोकांच्या मनातला प्रश्न अक्षय जाधवांनी विचारलापण होता एकदा , "काय सौरभराव, एकतरी पोरगी आवडत असलंच कि तुम्हाला." भैय्यांचं उत्तर त्यावर थक्क करणार होत, "हे बघ अक्शा. आपल्याला असले धंदे करण्यात कधी इंटरेस्ट नाय बघ. अन हा जेव्हा लग्न करावं वाटेल त्यावेळी सिंधुताई सपकाळांच्या आश्रमतल्या एखाद्या मुलीबरोबर करून टाकू. जिथं ना जातपात, ना कुंडली,ना आईबापाच्या संपत्तीचा विषय येईल."
       असेच दिवस चालले होते. पोरांची शिक्षण आपापल्या मार्गानी चालली होती, प्रत्येक जण आपापल्या गडबडीत असायचा, अशा काळात आमचा "जीन बॉईज ग्रुप" बनला. अंडरवर्ल्ड पासुन एम.पी.एस.सी देणाऱ्यांपर्यंत सगळे अँटिक प्राणी एकत्र झाले होते. मस्त जिंदगी चालली होती सगळ्यांची. सुट्टीमध्ये पोरं एकत्र जमणार, खेळणार, फिरणार, प्रत्येकाचा वाढदिवस जोरदार साजरा होणार. असं शाही थाट चालला होता सगळ्यांचा. सर्वात भारी वाढदिवस अक्षयचा झाला होता. म्हणजे डिसेम्बर महिन्यातली कडाक्याची थंडी, पार्टी गावाबाहेर, सगळे अगदी स्वेटर वगैरे घालून टाईट मध्ये आले होते. आता ह्या कडाक्याच्या थंडीसमोर भैय्यारावांची तब्येत एकदम नाजूक पण मित्राला दिलेला शब्द मोडण, कधी आमच्या स्वभावात नाही. २टी शर्ट अन त्यावर २जर्किन घालूनही कुडकुडत पोचले होते भैया कार्यक्रमाला. त्यादिवशी खूप उडवली त्याची.पण मनावर घेईल तो राजा माणूस कसला. त्यादिवसानंतर नेहमीप्रमाणे पुन्हा प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाले.
      एके दिवशी असाच ग्रुपवर मेसेज आला सौरभचा अपघात झालाय. वैभवला फोन केला तर त्याला सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये (सरकारी हॉस्पिटल) घेऊन गेले असं बोलला. आता सिल्वर ज्युबिली म्हणजे काहीतरी क्षुल्लक घटना असणार. तरी १०व्या मिनिटाला सगळे तिथं पोचले तर वैभवने सांगितलं कि सांगितलं भैय्यानी आपल्या हाताने स्वतःला संपवलं होतं. ना कसली चिठ्ठी ना कसला कुणाला फोन. का केलं? कुणासाठी केलं? कुणी त्रास देत होत का? कसला घातपात तर नसेल? कुणाला कसलाही अंदाज न येऊन देता सगळ्यांच्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजवून गेला होता सोप्या. खूप शोध घेतला सगळ्यानी आपापल्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा, पण उत्तर मिळूनही काही निष्पन्न होणार नव्हतं. "जीन बॉईज"ने ग्रुपमधला "राजा माणूस" गमावला होता कोणत्याही उत्तराने तो परत येणार नव्हता.

Comments

Popular posts from this blog

धुमाळवाडीचा धबधबा

          ते दिवस १२वीनंतरच्या सुट्टीचेे.साधारण जुलै महिना. महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचं सावट, आणि नुकतेच इंजिनीरिंगच्या ऍडमिशनचे राऊंड चालू झाले असतील. आमचं रोजचा दिनक्रम म्हणजे सकाळी ७ला उठणे.  त्यात ७ला उठणारे पठ्ठे २च - मी आणि ग्रुपचे  वैभव अर्थात आमचा कॅप्टन वैभ्या.  ग्राऊंडवर सर्व गँग गोळा करून २तास क्रिकेट खेळणे. हुशार म्हणवली जाणारी सगळी पोरं ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोचणार. पण बाकीचांच्या आपल्या आपल्या तऱ्हा. ५मिनिटांत आलो म्हणून अर्ध्या तासाने येणार ग्रुपचे भाई अर्थात बॉबीशेठ. आता भाई म्हणल्यावर कुणी काय बोलू शकत नाही. गपचूप निम्मे निम्मे गडी वाटून घेऊन डाव सुरु. अर्धी इनिंग झाल्यावर डोळे चोळत चोळत पल्ल्या येणार. भाईंच्या नावाने शिल्लक असलेल्या आणि त्यात २-४ची अजून भर टाकून सगळे  त्याला लांबूनच ८-१० शिव्या देऊन तोंडसुख घेणार. तरी तोंडावर हावभाव शून्य. जग काही म्हणलं तरी आम्हाला कधी फरक पडला नाही. त्याबरोबर येणार ओप्या. गेममध्ये नाव शक्तिमान असलं तरी ओप्याची तब्येत पाहता काडी पहिलवानपण ह्याच्यासमोर दंड ठोकून जाईल अशी परिस्थिती. तरी ओप्याला मान. कारण आमचा बोलण्यात कुणीच हात धरू

एक परी असावी..

आयुष्यात एक परी असावी, एका नजरेत डोळ्यातले अश्रू पुसणारी अन् एका हाकेमध्ये मनात प्रेमळ धडकी भरणारी, एका स्मितहास्यात जगाचा विसर पाडणारी अन वेळ पडली तर एका धपाट्यात भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणणारी, दिवसातून विनाकारण १०वेळा ओरडली तरी केवळ एका वाक्याच्या कौतुकाने भारावून जाणारी.. आयुष्यात एकतरी परी असावी.. कधी कळत कधी नकळत तुम्हाला तुमच्यातूनच हरवणारी पण तरी एका गोड शब्दात जिंकल्याचा आभास करून देणारी.. वृषाल भोसले २०/०७/२०१६

महिना शेवटचा...!!

तो काळंच वेगळा असतो, शेवटचं वर्ष सुरू होताना कॉलेजातून सुटकेचा आनंद शेवटच्या सत्रात काहीसा कमी कमी होत चाललेला असतो. प्रत्येक जण आपल्या भावी करियरबद्दल विचार करत असतानाच प्रियकरांचा न लाभलेलं प्रेम मिळवायचा शेवटचा प्रयत्न करायचा निर्धार झालेला असतो, इतर वेळी अशक्य वाटणारे शिक्षकवर्ग सबमिशनलाही त्रास देणं बंद करून टाकतात, डिग्री संपेपर्यंत वर्गातील हाय हॅलो वाले मित्रही नकळत जवळ येऊन गेलेले असतात. इतक्यात कोणीतरी म्हणतं - "अरर.. एकच महिना राहिला कॉलेज संपायला..!!" सुटकेच्या आनंदावर थोडं विरजन पाडणारा हा पाहिला वार असतो. आपल्या आपल्या ग्रुपच्या वर्गाच्या फेयरवेल पार्ट्या सुरू होतात. ४ वर्षांच्या आठवणी काढायचा दिवस असतो, डिग्री संपेपर्यंत कधी पाश्चिमात्य पेहरावात ना दिसलेली ती आज वनपीसवर मिरवत असते, तिला पाहून कधी स्टेजवर न गेलेल्या तोही त्यावेळी भाषण देऊन टाकतो..! रोज नव्या कारणावरून कॉलेजला वाईट बोलणारी तोंडाच्या मनात त्याच कॉलेजबद्दल आस्था निर्माण व्हायला लागलेली असते. जसा वेळ जाईल तसा राहिलेल्या असाईनमेंट करू, येणाऱ्या परिक्षेकडे लक्ष देऊ, करियर कडे बघू, की मित